पुणे : जागतिक चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृती, वैविध्यपूर्ण विषय आणि आशयसमृद्ध सिनेमांचा अनुभव पुणेकरांना घेता येणार आहे. ९वा अण्णा भाऊ साठे आंतर

पुणे : जागतिक चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृती, वैविध्यपूर्ण विषय आणि आशयसमृद्ध सिनेमांचा अनुभव पुणेकरांना घेता येणार आहे. ९वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ११ ते १३ डिसेंबर २०२६ या कालावधीत पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (NFAI) रंगणार आहे. ऑस्करच्या शर्यतीच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग (पुणे) आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाचे आयोजन अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती आणि निर्मिती मीडिया सोल्यूशन्स यांच्या वतीने करण्यात आले आहे. शब्बीर साबुवाला आणि रचना व्होरा यांचेही या आयोजनाला सहकार्य लाभले आहे. महोत्सवाचे दिग्दर्शक संदीप ससाणे यांनी ही माहिती दिली.
महोत्सवाच्या परीक्षक मंडळात ज्येष्ठ दिग्दर्शक सुनील सुकथनकर, प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि चित्रपट निर्माती व संकलक सुचित्रा साठे यांचा समावेश आहे. ‘गोंधळ’ या चित्रपटासह ‘शेप ऑफ मोमो’, ‘मेंबर्स ऑफ द प्रॉब्लेमॅटिक फॅमिली’, ‘रेहमत’ आणि ‘मयिला’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन महोत्सवात होणार आहे.
त्रिबेणी राय दिग्दर्शित नेपाळी चित्रपट ‘शेप ऑफ मोमो’ स्त्रीजीवन आणि सामाजिक बंधनांमधील स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास मांडतो. आर. गौतम दिग्दर्शित तमिळ चित्रपट ‘मेंबर्स ऑफ द प्रॉब्लेमॅटिक फॅमिली’चा प्रीमियर ७६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘बर्लिनाले फोरम’ विभागात झाला आहे. गुरविंदर सिंग दिग्दर्शित ‘रेहमत’मध्ये पंजाबचे सामाजिक-सांस्कृतिक वास्तव संवेदनशीलपणे उलगडले आहे. या चित्रपटाची ७९व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड झाली आहे. तर सेम्मलार अन्नम दिग्दर्शित तमिळ चित्रपट ‘मयिला’ एका तरुण आईचा संघर्ष आणि आत्मनिर्भरतेचा प्रवास मांडतो. या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला असून, तसवीर चित्रपट महोत्सवात त्याने ग्रँड ज्युरी पुरस्कार पटकावला आहे.
यंदाच्या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लघुपट आणि माहितीपट. विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या या कलाकृतींचे विशेष प्रदर्शनही महोत्सवात होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या चित्रपटांसोबतच देशातील नवोदित आणि स्वतंत्र चित्रपटकर्त्यांच्या सर्जनशीलतेचा आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कथानक, मांडणी आणि विषयवैविध्याच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील नवे प्रवाह जाणून घेण्यासाठी हा महोत्सव एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
बर्लिन, लोकार्नो, रॉटरडॅम आणि बुसानसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून नावाजलेल्या कलाकृती, देशभरातून आलेले लघुपट व माहितीपट आणि मराठी चित्रपटाचा जागतिक स्तरावर लक्ष वेधणारा ‘गोंधळ’ अशा विविधांगी सिनेमाई पर्वणीमुळे यंदाचा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

COMMENTS