सिनेकट्टा - आशिष निनगुरकर ‘गणा धाव रे’ : रेटिंग : ⭐⭐⭐⭐ (४/५) 'बाप्पा आणि भक्ताचं नातं शब्दांत मांडता येत नाही, कारण या नात्याची ताकद श्रद्ध
सिनेकट्टा – आशिष निनगुरकर
‘गणा धाव रे’ : रेटिंग : ⭐⭐⭐⭐ (४/५)
‘बाप्पा आणि भक्ताचं नातं शब्दांत मांडता येत नाही, कारण या नात्याची ताकद श्रद्धेत असते!’ हीच भावना अनुभवायला मिळते ती केदार शिंदे दिग्दर्शित ‘गणा धाव रे’ या चित्रपटातून. गणपती बाप्पावरील अढळ श्रद्धा, भक्तीची ताकद, माणुसकीची जाणीव आणि संघर्षातून उभा राहणारा आत्मविश्वास यांचा सुंदर संगम म्हणजे हा चित्रपट! कोकणच्या मातीतील संस्कृती, परंपरा आणि बाप्पावरील भक्तीचा भाव उलगडणारा हा चित्रपट खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबासाठी एक सुंदर मनोरंजनात्मक मेजवानी ठरतो.
‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि ‘कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ निर्मित ‘गणा धाव रे’ हा चित्रपट आपल्या वेगळ्या विषयामुळे लक्ष वेधून घेतो. सूरज सिंग, चैतन्य राणे, नूतन जैन, रिचर्ड पीटर्स आणि सना महेश कुकरेजा यांच्या निर्मितीत साकारलेला हा चित्रपट आशयघन आणि वैविध्यपूर्ण कथाकथनाचा प्रयत्न करतो. सह-निर्माते अवनी सक्सेना आणि फरहीन अफजल खान, तसेच कार्यकारी निर्माते गौरव विचारे यांचेही या प्रकल्पातील योगदान महत्त्वाचे आहे. निर्मितीमूल्यांच्या दृष्टीने चित्रपटाची मांडणी प्रभावी वाटते.
कोकण आणि गणपती बाप्पा यांचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं आणि अनोखं आहे. कोकणातील गणेशोत्सव, गावोगावी जपल्या जाणाऱ्या परंपरा, गणेशमूर्ती घडवणाऱ्या कलाकारांची श्रद्धा आणि बाप्पाच्या आगमनासाठी आतुर असलेली भक्तमंडळी या सगळ्यांचं एक वेगळंच भावविश्व असतं. याच भावविश्वाचा वेध घेत ‘गणा धाव रे’ ही कथा प्रेक्षकांसमोर येते. कल्पनारंजन आणि वास्तव यांचा सुरेख मेळ साधत भक्त आणि दैवत यांच्यातील नात्याचा भावपूर्ण शोध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. कोकणातील सण-उत्सव, परंपरा, स्थानिक जीवनपद्धती आणि गणेशभक्तीची अनोखी संस्कृती यांना कथानकात महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर एका समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं दर्शनही घडवतो.
चित्रपटाच्या कथानकात गणेशमूर्ती घडवण्याच्या कलेभोवती एक मोठा संघर्ष उभा राहतो. गावातील मूर्तिकार हेरंब सावंत यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात संकट उभं राहतं. गंभीर दुखापतीमुळे त्यांना पुन्हा मूर्तिशाळेत पाऊल ठेवणंही अशक्य होतं. अशा परिस्थितीत त्यांच्या मुलीने अवघ्या पंधरा दिवसांत बाप्पाची मूर्ती घडवण्याचं आव्हान स्वीकारणं, हा कथानकातील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्कंठावर्धक टप्पा आहे. एका बाजूला गावातील संघर्ष, दुसऱ्या बाजूला बाप्पावरील श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत यामुळे चित्रपटाला वेगळंच परिमाण प्राप्त होतं.
या चित्रपटाची कथा चैतन्य राणे यांनी लिहिली असून, पटकथा ओंकार मंगेश दत्त यांची आहे, तर संवादलेखनाची जबाबदारी श्रेयस वैद्य यांनी सांभाळली आहे. या तिघांच्या लेखनाचं विशेष कौतुक करावं लागेल. कथेतील कल्पकता, प्रसंगांची योग्य बांधणी आणि पटकथेतील नाट्यमयता यामुळे चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. भक्ती, श्रद्धा आणि संघर्ष यांसारखे विषय हाताळताना त्यात मनोरंजनाची योग्य पेरणी करण्यात आली आहे. संवाद हे चित्रपटाचं आणखी एक बलस्थान आहे. प्रसंगानुरूप येणारे संवाद, त्यातील भावनिक खोली आणि काही ठिकाणी जाणवणारी मार्मिकता मनाला भिडते. संवाद केवळ प्रसंग पुढे नेत नाहीत, तर व्यक्तिरेखांचं भावविश्वही उलगडतात. कथा, पटकथा आणि संवाद यांचा उत्तम मेळ साधल्यामुळे चित्रपट अधिक प्रभावी झाला आहे.
‘ही त्या बाप्पाची परीक्षा आहे आणि बाप्पाला त्यात पास व्हावंच लागेल!’ अशा आशयाचा संवाद चित्रपटातील संघर्षाची तीव्रता अधोरेखित करतो. देवावर श्रद्धा असणं आणि संकटाच्या वेळी त्या श्रद्धेच्या बळावर उभं राहणं, यातील फरक चित्रपट सुंदरपणे मांडतो. एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेची ही कथा केवळ धार्मिक भावनेपुरती मर्यादित राहत नाही, तर त्यातून जिद्द, आत्मविश्वास आणि माणुसकीचा संदेशही मिळतो.
केदार शिंदे यांचं दिग्दर्शन म्हणजे चित्रपटाचा सर्वात मोठा जमेचा पैलू! ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘बाईपण भारी देवा’ अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या केदार शिंदे यांनी यावेळी भक्ती आणि अध्यात्माचा विषय तितक्याच प्रभावीपणे हाताळला आहे. प्रत्येक प्रसंगातील भावनिकता, कथानकातील नाट्यमयता आणि कोकणच्या मातीशी असलेली नाळ त्यांनी उत्तमरीत्या जपली आहे. मनोरंजन आणि भावनिक आशय यांचा समतोल साधण्यात ते यशस्वी ठरतात. विषयातील श्रद्धा, त्यातील संघर्ष आणि व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध यांची मांडणी त्यांच्या दिग्दर्शनातून प्रभावीपणे समोर येते.
भरत जाधव यांचा अभिनय म्हणजे चित्रपटाची खरी ताकद! मूर्तिकाराच्या भूमिकेत त्यांनी अक्षरशः जीव ओतला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, संवादफेक, देहबोली आणि भूमिकेतील सहजता कमालीची आहे. विशेष म्हणजे त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा अभिनय खरोखरच काबिलेतारीफ आहे. एका कलाकाराच्या आयुष्यातील संघर्ष, त्याची कला, त्याचं कुटुंब आणि बाप्पावरील श्रद्धा हे सगळं त्यांनी अतिशय ताकदीने व्यक्त केलं आहे. विनोदी भूमिकांमधून लोकप्रिय झालेले भरत जाधव भावनिक आणि गंभीर प्रसंगांमध्येही किती प्रभावी ठरू शकतात, याची प्रचिती या भूमिकेतून येते.भार्गवी चिरमुले यांनी भरत जाधव यांच्या पत्नीची भूमिका अत्यंत सहजसुंदर पद्धतीने साकारली आहे. संसारातील चढ-उतार, पतीच्या संघर्षातील त्यांची साथ आणि भावनिक प्रसंगांमधील संयम या सगळ्याच गोष्टी त्यांच्या अभिनयातून प्रभावीपणे व्यक्त होतात. त्यांच्या अभिनयातील विविध छटा लक्षवेधी आहेत. प्रणाली घोगरे यांनीही आपल्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. कथानकातील संघर्ष आणि भावनिक प्रवासात त्यांची व्यक्तिरेखा महत्त्वाची ठरते. त्यांनी निभावलेली दोन्ही भूमिका लक्षवेधी आहेत तसेच विशेषतः संकटाच्या काळात उभं राहण्याची जिद्द आणि आत्मविश्वास त्यांच्या अभिनयातून जाणवतो.बाप्पाचा भक्त आणि भक्तांचा बाप्पा याची प्रचिती येते.
युवा कलाकार आशुतोष गायकवाड आणि पुष्कराज चिरपुटकर यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपल्या व्यक्तिरेखांना त्यांनी दिलेला न्याय आणि पडद्यावरील सहज वावर चित्रपटाला अधिक रंगतदार बनवतो. अनुभवी कलाकारांसोबत युवा कलाकारांची उपस्थिती कथानकाला एक वेगळी ऊर्जा देते. सुलभा आर्या, कल्पना सारंग, राघव एन. गाडगे, काजल काटे, स्वप्निल परजणे गोप्या आणि ओंकार पाटील यांच्यासह इतर सहकलाकारांनीही चित्रपटातील व्यक्तिरेखांचं विश्व समृद्ध केलं आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या युवा कलाकाराचं विशेष कौतुक करावं लागेल. त्याचा पडद्यावरील वावर, देहबोली आणि व्यक्तिरेखेतील नकारात्मक छटा प्रभावी आहेत. अशा भूमिकांमुळे कथानकातील संघर्ष अधिक ठळक होतो. अनुभवी आणि युवा कलाकारांचा हा सुरेख संगम चित्रपटाला अधिक रंगतदार बनवतो.
चित्रपटाचं संगीत आणि गाणी हा आणखी एक हृदयस्पर्शी पैलू आहे. कुणाल भगत आणि रविराज विजय कोलथरकर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चित्रपटाच्या आशयाला साजेशी आहेत. गीतकार वलय मालगुंड यांच्या शब्दांतून भक्तीचा भाव आणि बाप्पावरील श्रद्धा सुंदरपणे व्यक्त होते. कथानकातील भावनांना पूरक असलेली गाणी मनाला भिडतात. काही गाणी थेट काळजाला हात घालतात. योग्य प्रसंगी येणारं संगीत आणि पार्श्वसंगीत प्रसंगांची परिणामकारकता वाढवतं. चित्रपटातील संगीत केवळ मनोरंजन करत नाही, तर कथानकातील भावनिक प्रवासाचाही एक महत्त्वाचा भाग बनतं. मयूर हरदास यांचं छायांकन आणि संकलनही चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला महत्त्वपूर्ण ठरतं. कोकणातील निसर्गरम्य वातावरण, गावातील संस्कृती, गणेशमूर्ती घडवण्याची प्रक्रिया आणि मूर्तिकारांच्या कलेचं दर्शन पडद्यावर छान अनुभवायला मिळतं. दृश्यात्मक मांडणी, प्रसंगांची बांधणी आणि वातावरणनिर्मिती यामुळे चित्रपटाचा आशय अधिक प्रभावी होतो. दिग्दर्शन, अभिनय, लेखन, संगीत आणि तांत्रिक विभाग यांचा सुरेख मेळ चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.
साधारण दोन ते सव्वादोन तासांचा हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ मनोरंजन देत नाही, तर बरंच काही विचार करायला लावतो. श्रद्धा म्हणजे नेमकं काय, संकटाच्या काळात माणूस कोणत्या शक्तीच्या आधारावर उभा राहतो आणि भक्त व दैवत यांचं नातं किती अनोखं असतं, याची जाणीव हा चित्रपट करून देतो. काही प्रसंग भावुक करतात, काही प्रसंग उत्कंठा वाढवतात, तर काही प्रसंग बाप्पावरील आपली श्रद्धा अधिक दृढ करतात. एकंदरीत, ‘गणा धाव रे’ हा भक्ती, संघर्ष, कला, कुटुंब आणि माणुसकी यांचा सुंदर संगम आहे. केदार शिंदे यांचं प्रभावी दिग्दर्शन, चैतन्य राणे यांची आशयपूर्ण कथा, ओंकार मंगेश दत्त यांची प्रभावी पटकथा, श्रेयस वैद्य यांचे मनाला भिडणारे संवाद, भरत जाधव यांचा दमदार अभिनय, भार्गवी चिरमुले आणि प्रणाली घोगरे यांची सहजसुंदर कामगिरी, आशुतोष गायकवाड आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह सर्व कलाकारांचा सहभाग, कुणाल भगत आणि रविराज विजय कोलथरकर यांचं संगीत, वलय मालगुंड यांची गाणी आणि मयूर हरदास यांचं छायांकन व संकलन यामुळे हा चित्रपट एक वेगळा अनुभव देतो.
‘बाप्पाची लीला अगाध आहे!’ याची प्रचिती देणारा हा चित्रपट प्रत्येक गणेशभक्ताने आणि मराठी चित्रपटप्रेमीने आवर्जून पाहावा. विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंबासोबत चित्रपटगृहात जाऊन अनुभवण्यासारखा हा चित्रपट आहे. चित्रपट संपल्यानंतरही बाप्पा आणि भक्त यांच्यातील अनोख्या नात्याची भावना मनात रेंगाळत राहते.एक उत्तम, सहजसुंदर आणि मनाला समाधान देणारा मराठी चित्रपट पाहिल्याचा आनंद देणारा ‘गणा धाव रे’ नक्कीच पाहावा!गणपती बाप्पा मोरया!
रेटिंग : ⭐⭐⭐⭐ (४/५)
आशिष निनगुरकर
(लेखक चित्रपट अभ्यासक,समीक्षक आणि पटकथाकार आहेत.)
चित्रपट : गणा धाव रे (२०२६)
प्रस्तुती : बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स
निर्मिती : कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड
निर्माते : सूरज सिंग, चैतन्य राणे, नूतन जैन, रिचर्ड पीटर्स आणि सना महेश कुकरेजा
सह-निर्माते : अवनी सक्सेना आणि फरहीन अफजल खान
कार्यकारी निर्माते : गौरव विचारे
दिग्दर्शक : केदार शिंदे
कथा : चैतन्य राणे
पटकथा : ओंकार मंगेश दत्त
संवाद : श्रेयस वैद्य
संगीत : कुणाल भगत आणि रविराज विजय कोलथरकर
गीतकार : वलय मालगुंड
छायांकन आणि संकलन : मयूर हरदास
कलाकार : भरत जाधव, प्रणाली घोगरे, भार्गवी चिरमुले, पुष्कराज चिरपुटकर, सुलभा आर्या, आशुतोष गायकवाड, कल्पना सारंग, राघव एन. गाडगे, काजल काटे, स्वप्निल परजणे गोप्या, ओंकार पाटील आणि इतर कलाकार.

COMMENTS